मराठी ग्रामीण कादंबरी 'नांगरमुठी'तील पर्यावरण विषयक जाणीवा
Abstract
जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी तसेच विकासासाठी आवश्यक असणारे आवरण म्हणजेच पर्यावरण होय. या आवरणातच जीवसृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय सामावलेला आहे. मानव हा या जीवसृष्टीतला महत्त्वाचा घटक आहे. या मानवनिर्मित साहित्यात संपूर्ण मानवी जीवन साकारले आहे. पर्यावरण हा मानवी जीवनाचा अविभाज्य आणि आवश्यक घटक साहित्यात येणे स्वाभाविकच आहे. ग्रामीण जीवन हे तर निसर्गाच्या कुशीतच वसलेले आहे. पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ या कादंबरीत पर्यावरण हा घटक कादंबरीचा केवळ भाग म्हणून नव्हे तर संपूर्ण कादंबरीची पार्श्वभूमी म्हणूनच येतो. कादंबरीच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही कादंबरी शेतीशी निगडित आहे. कादंबरीच्या सुरूवातीलाच अस्वल्या बैल मेल्याने त्यासाठी रडणारा औतेराव दिसतो. त्याने महापूराला समोरा जाऊन म्हैस व अस्वल्या बैलाला वाचवलेले असते. औतेरावचे वडील हरीपंत या प्राण्यांवर मुलाप्रमाणे प्रेम करत असतात. कादंबरीमध्ये निसर्गसौंदर्य वारंवार येत राहते. पर्यावरणातील ऊन, वारे, पाऊस, झाडे, वन्य प्राणी इत्यादींविषयीचेही प्रेम आपलेपणाच्या भावना या कादंबरीमध्ये दिसतात. गर्द झाडी, अनंत आकाश, डोंगर, नदी, ओढे, हिरवे माळ, आकाशातील चंद्र, तारे तसेच पक्षी-प्राणीसृष्टी यांची सुंदर वर्णने कादंबरीमध्ये आलेली आहेत. लेखकाने या कादंबरीमध्ये मानवी मनाचे भरण पोषण करणारा हा निसर्ग आहे याची वाचकांना जाणीव करून दिली आहे. याबद्दलची कृतज्ञता ही या ठिकाणी लेखकाने व्यक्त केली आहे. कधी कधी महापूर, दुष्काळ, रोगराई यांच्या रुपाने रौद्ररूप धारण करणाऱ्या या पर्यावरणाप्रती मानवाच्या मनात भीतीही आहे. पर्यावरणाप्रती या भावना जशा मानवी मनात आहेत तसेच मानवाने या पर्यावरणावरती स्वार्थासाठी घातलेला घाला आणि स्वतःचेच भविष्य धोक्यात आणल्याची चिंताही लेखकाने व्यक्त केली आहे.